नीट-पीजी प्रवेशासाठी कटऑफमध्ये मोठी घट; वादाला तोंड फुटले! | NEET PG Cut-off Reduced Sharply!

NEET PG Cut-off Reduced Sharply!

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट-पीजी (NEET-PG) परीक्षेच्या कटऑफमध्ये यंदा मोठी घट करण्यात आली आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) आदेशानुसार हा निर्णय घेतला असून, यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा कटऑफ थेट ७ पर्सेंटाइलवर, तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा कटऑफ शून्य पर्सेंटाइलपर्यंत खाली आला आहे.

NEET PG Cut-off Reduced Sharply!

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी कटऑफ कमी करण्याचा निर्णय सलग तिसऱ्या वर्षी घेण्यात आला आहे. यंदा प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीला खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के, दिव्यांग प्रवर्गासाठी ४५ टक्के, तर आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के असा कटऑफ निश्चित करण्यात आला होता. मात्र, प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण होऊनही सुमारे १८ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्याने एनएमसीच्या निर्देशानुसार NBEMS ने पर्सेंटाइल कमी करण्याचा निर्णय घेतला.

या बदलामुळे खुल्या प्रवर्गात १३० गुण, दिव्यांग प्रवर्गात ९० गुण, तर आरक्षित प्रवर्गात केवळ ४० गुण मिळविणारे उमेदवारही आता प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. याआधीच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गासाठी २७५ गुण, दिव्यांग प्रवर्गासाठी २५५ गुण आणि आरक्षित प्रवर्गासाठी २३५ गुण मिळवणे आवश्यक होते.

NBEMS कडून हा निर्णय “अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासाठी” घेतल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठीच कटऑफ कमी करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, या निर्णयावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कटऑफ इतक्या मोठ्या प्रमाणात कमी केल्याने प्रवेश परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे त्यांचे मत आहे. तसेच, हा निर्णय खासगी पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयांना फायदेशीर ठरणारा असून, अत्यल्प गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास भविष्यात वैद्यकीय शिक्षणाच्या व आरोग्यसेवेच्या दर्जावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

उल्लेखनीय म्हणजे, नीट-पीजीचा निकाल १९ ऑगस्ट रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत प्रवेशाच्या दोन फेऱ्या पार पडल्या असून, तिसऱ्या फेरीपासून हा नवीन कटऑफ लागू होणार आहे.

Comments are closed.