ठाणे महानगरपालिकेत नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तांत्रिक अडचणी आणि निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली १७७३ पदांची मेगाभरती अखेर मार्गी लागली असून, एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत.

ऑगस्ट २०२५ मध्ये ‘क’ व ‘ड’ वर्गातील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, निवडणुकांची घोषणा झाल्याने राज्यात आचारसंहिता लागू झाली आणि भरतीला तात्पुरता ब्रेक लागला. त्यानंतर आरक्षणाशी संबंधित तांत्रिक मुद्दे आणि पदांच्या सुधारित आराखड्यामुळे प्रक्रिया आणखी लांबली. आता हे सर्व अडथळे दूर झाले असून भरतीची फाईल पुन्हा गतीने पुढे सरकत आहे.
या मेगाभरतीत आरोग्य आणि अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्यात आले आहे. आरोग्य विभागात परिचारिका (५५७), प्रसविका (११७), लॅब टेक्निशियन, वॉर्ड बॉय आणि दवाखाना आया यांसारख्या पदांची मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. तसेच अग्निशमन दलात ३८९ फायरमन पदे, चालक-यंत्रचालक २७७ पदे, लिपिक-टंकलेखक ५३ पदे, लेखा लिपिक ३२ पदे, कनिष्ठ अभियंता आणि इतर तांत्रिक सहाय्यक पदांचा समावेश आहे. याशिवाय अटेंडंट, ईसीजी टेक्निशियन आणि इतर विविध पदांवरही भरती केली जाणार आहे.
ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केले आहेत, त्यांच्या अर्जांची छाननी अंतिम टप्प्यात असून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेतली जाणार असून पारदर्शकतेसाठी नामांकित संस्थेकडे जबाबदारी सोपवली जाईल.
या भरतीमुळे ठाणे महापालिकेतील रिक्त पदांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असून आरोग्य व आपत्कालीन सेवा अधिक सक्षम होणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या भरतीला अखेर गती मिळाल्याने ठाण्यातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed.