राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसप्रवासात सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठी आता ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बनावट आधार कार्डच्या आधारे सवलती घेतल्या जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महामंडळाने पूर्वी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली होती. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक तांत्रिक अडचणी आल्या. पैसे भरूनही कार्ड न मिळणे, रिचार्ज न होणे, चुकीची कार्डे वितरित होणे अशा तक्रारींमुळे हा प्रकल्प अयशस्वी ठरला. त्यामुळे आता स्मार्ट कार्डऐवजी एनसीएमसी कार्डचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.

महामंडळाने ईबिक्स टेक्नोलॉजिस लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्याशी करार करून हा प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे. सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू केली जाणार असून, ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार शक्य करणारे डिजिटल पाऊल असल्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
एनसीएमसी कार्डसाठी विविध प्रवर्गातील सवलतधारक पात्र ठरणार आहेत. शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ७५ वर्षांवरील ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिकांना आधार क्रमांकाशी संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवाशांसाठी यूडीआयडी क्रमांक जोडलेले कार्ड दिले जाणार आहे. तसेच पुरस्कारार्थी, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना स्थानिक विभागीय कार्यालयामार्फत कार्डचे वितरण केले जाईल.
नवीन एनसीएमसी कार्डची किंमत जीएसटीसह १९९ रुपये ठेवण्यात आली आहे. जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास ५० रुपयांची सूट मिळून हे कार्ड १४९ रुपयांत उपलब्ध होईल. कार्डमध्ये सुरुवातीला १०० रुपयांचा रिचार्ज असणार असून, पुढे ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येईल. ईटीआयएम मशिन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल अॅप किंवा नियुक्त एजंटमार्फत रिचार्जची सुविधा उपलब्ध राहणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या नोंदणीसाठी एसटी स्थानकांवर सुमारे तीन हजार एजंट नियुक्त करण्यात येणार आहेत.
एकूणच, एसटी प्रवास अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि डिजिटल करण्यासाठी एनसीएमसी कार्ड प्रणाली लागू करण्यात येत असून, सवलतधारक प्रवाशांसाठी ही नवी व्यवस्था लवकरच कार्यान्वित होणार आहे.

Comments are closed.