राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) सवलतधारक प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) लागू करण्याची घोषणा केली असून, आता एसटी प्रवासातील सर्व प्रकारच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत राज्यभरातून दहा हजारांहून अधिक प्रवाशांनी या कार्डसाठी नोंदणी केली आहे.

महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पुरस्कारार्थी यांसह एकूण २१ विविध श्रेणींतील प्रवाशांना तिकीटदरात १० ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत मिळते. बनावट आधारकार्डच्या वापरावर आळा घालण्यासाठी आणि सवलत वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी महामंडळाने एनसीएमसी कार्ड लागू केले आहे.
नोंदणीसाठी प्रवाशांनी आपल्या जवळच्या एसटी आगार किंवा विभागीय कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो. शुल्क भरल्यानंतर कार्ड वितरित केले जाते. नव्या कार्डसाठी १९९ रुपये शुल्क आकारले जात असून, जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपये शुल्क आकारले जाईल. म्हणजेच ५० रुपयांची सूट देण्यात आली आहे.
कार्ड वापरण्यासाठी किमान १०० रुपयांचे रिचार्ज आवश्यक आहे आणि पुढील रिचार्ज ५० रुपयांच्या पटीत करता येईल. हे रिचार्ज वाहकांच्या ईटीआयएम मशीनद्वारे, अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल अॅप किंवा अधिकृत एजंटमार्फत करता येणार आहे.
एसटीने सवलतधारक प्रवाशांना लवकरात लवकर एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून भविष्यातील प्रवास सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने होऊ शकेल.

Comments are closed.