नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) कडून सहाय्यक फोरमन (ट्रेनी) ग्रेड-C पदांसाठी थेट भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 270 रिक्त पदे भरली जाणार आहेत. कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी आणि मिनिरत्न पीएसयू असलेल्या एनसीएलमध्ये तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती मध्य प्रदेशातील सिंगरौली व उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील कोळसा खाणी व प्रकल्पांमध्ये करण्यात येणार आहे.

या भरतीत सहाय्यक फोरमन (इलेक्ट्रिकल) – 148 पदे, सहाय्यक फोरमन (मेकॅनिकल) – 108 पदे आणि सहाय्यक फोरमन (E&T) – 14 पदांचा समावेश आहे. अर्जदारांनी मान्यताप्राप्त मंडळातून किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून संबंधित अभियांत्रिकी शाखेत (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन) किमान 3 वर्षांचा डिप्लोमा असावा. बीई/बीटेक धारक उमेदवारही अर्ज करू शकतात. 5 मार्च 2026 रोजी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे असावी; अनुसूचित जाती/जमातींसाठी 5 वर्षे आणि ओबीसी-NCL साठी 3 वर्षे सवलत लागू आहे.
निवड प्रक्रियेत 100 गुणांची संगणक आधारित परीक्षा (CBT) होईल. 90 मिनिटांच्या परीक्षेत तांत्रिक ज्ञानावर 70 प्रश्न आणि सामान्य ज्ञान, तर्कशक्ती व क्षमता चाचणीवर 30 प्रश्न असतील. परीक्षेत नकारात्मक गुणपद्धती नाही. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹47,330.25 मूलभूत वेतनासोबत डीए, एचआरए, उपस्थिती भत्ता व इतर सुविधा मिळतील. प्रशिक्षण कालावधी E&T साठी 1 वर्ष तर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी 2 वर्षे आहे.
सामान्य/ओबीसी/EWS प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ₹1,180 (₹1000 + GST ₹180) असून SC/ST/PwBD/माजी सैनिकांसाठी शुल्क माफ आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होऊन 5 मार्च 2026 रात्री 11:59 पर्यंत चालणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ nclcil.in वर जाऊन नोंदणी करून अर्ज भरावा व अंतिम सादरीकरणापूर्वी पात्रता निकष तपासावेत.

Comments are closed.