शिक्षक होण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदापासून प्रवेश प्रक्रियेत ऐतिहासिक बदल करण्यात आला आहे. चार वर्षांच्या एकात्मिक शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमासाठी (ITEP) आता राज्यस्तरीय सीईटीऐवजी थेट राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा – NCET देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यामुळे आतापर्यंत राज्यागणिक वेगवेगळ्या परीक्षांमुळे निर्माण होणारा गोंधळ संपुष्टात येत देशभर एकसमान प्रवेश पद्धती लागू झाली आहे.
यापूर्वी राज्यात बीए/बीएससी-बीएड (एकात्मिक) अभ्यासक्रमासाठी सीईटी कक्षामार्फत प्रवेश दिला जात होता. मात्र शिक्षक शिक्षणाचा दर्जा व निकष राष्ट्रीय पातळीवर समान ठेवण्यासाठी National Council for Teacher Education (NCTE) यांनी हा अभ्यासक्रम ITEP स्वरूपात राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संपूर्ण प्रवेश प्रक्रिया केंद्रीकृत करण्यात आली असून परीक्षा घेण्याची जबाबदारी National Testing Agency (NTA) कडे देण्यात आली आहे.
या नव्या निर्णयानुसार केंद्रीय व राज्य विद्यापीठे, IIT, NIT, प्रादेशिक शिक्षण संस्था तसेच सरकारी महाविद्यालयांमधील सर्व ITEP प्रवेश NCET च्या गुणांवरच दिले जाणार आहेत. हा चार वर्षांचा अभ्यासक्रम दुहेरी रचनेचा असून शिक्षण हा मुख्य विषय आणि विद्यार्थ्यांच्या निवडीनुसार दुसरा विषय असणार आहे.
NCET 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 11 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम मुदत त्याच दिवशी रात्री 11:50 वाजेपर्यंत आहे. अर्जातील माहिती दुरुस्त करण्यासाठी 12 ते 14 मार्च दरम्यान सुधारणा विंडो उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राथमिक वेळापत्रकानुसार परीक्षा 17 एप्रिल रोजी संगणक आधारित पद्धतीने देशभर 13 भाषांमध्ये होणार आहे.
परीक्षा शहर, प्रवेशपत्र, उत्तरतालिका, निकाल व समुपदेशनासंबंधी सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाणार आहे. NCET मध्ये पात्र ठरलेले उमेदवार संबंधित संस्थांच्या समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. एकूणच, शिक्षक शिक्षणासाठी एकच राष्ट्रीय परीक्षा लागू झाल्याने प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुसंगत आणि विद्यार्थ्यांसाठी सोपी होणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातून मत व्यक्त केले जात आहे.

Comments are closed.