शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. National Council of Educational Research and Training (NCERT) ने ११७ अध्यापन पदांसाठी थेट भरती प्रक्रिया जाहीर केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरती मोहिमेत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक तसेच ग्रंथपाल या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी NCERT च्या अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वर जाऊन त्वरित अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मार्च निश्चित करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे.
NCERT ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरात क्रमांक १७७/२०२६ नुसार एकूण ११७ पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी ११४ पदे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या अध्यापन पदांसाठी आहेत, तर ३ पदे उपग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती नवी दिल्ली, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर आणि शिलाँग येथील NCERT च्या विविध कॅम्पसमध्ये केली जाणार आहे.
या सर्व पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर अटी अधिकृत अधिसूचनेत सविस्तर दिल्या आहेत. वयोमर्यादा, निवृत्तीचे वय तसेच वयोमर्यादेतील सवलती भारत सरकार, यूजीसी आणि NCERT च्या नियमांनुसार लागू राहतील.
तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार सवलती दिल्या जाणार आहेत. अर्ज शुल्काबाबत बोलायचे झाल्यास सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ₹१,००० शुल्क निश्चित करण्यात आले आहे, तर एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. हे शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी UGC आणि NCERT च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मुलाखतीत मिळालेल्या गुणांवर आधारित तयार केली जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम ncert.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी, त्यानंतर अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी.
आवश्यक असल्यास अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा आणि त्याची प्रिंट सुरक्षित ठेवावी. NCERT ने उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी पात्रता अटी, आरक्षण धोरण आणि इतर सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला आहे.

Comments are closed.