जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी यंदा अभूतपूर्व स्पर्धा पाहायला मिळत आहे. राज्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाली असून, कन्नड येथील नवोदय विद्यालयातील एका जागेसाठी तब्बल २५० विद्यार्थी रांगेत आहेत. इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा १३ डिसेंबर रोजी होणार आहे.
या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण १९ हजार ३११ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, ही संख्या मागील काही वर्षांतील उच्चांक मानली जात आहे. जिल्ह्यात ५२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून, त्यापैकी ११ केंद्रे शहरात तर ४१ केंद्रे ग्रामीण भागात असतील.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय असून, प्रत्येकी ८० जागांवर सहावीला प्रवेश दिला जातो. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के आणि शहरी विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव आहेत.
मोफत व दर्जेदार निवासी शिक्षणामुळे नवोदय विद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असून, यंदा ही स्पर्धा सर्वाधिक तीव्र स्वरूपात छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसून येत आहे.

Comments are closed.