नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील ५२७ पोलिस शिपाई व संबंधित पदांसाठी भरती प्रक्रियेला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून तब्बल ५०,४६० उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. या भरती अंतर्गत पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक आणि बँड्समॅन अशा पदांचा समावेश आहे.
११ फेब्रुवारीपासून कळंबोली येथील पोलिस मुख्यालयात अर्जदारांची ५० गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. या शारीरिक चाचणीत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच पुढील टप्प्यातील १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. चालक व बँड्समॅन पदांसाठी मैदानी चाचणीनंतर कौशल्य चाचणी देणेही अनिवार्य राहणार आहे.
वाढती लोकसंख्या आणि नव्याने सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस दलासाठी ही भरती प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि गुणवत्ताधारित पद्धतीने राबवली जात आहे.
उमेदवारांच्या सोयीसाठी कळंबोली येथे राहण्याची, जेवणाची, वैद्यकीय सेवा आणि स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात शंका असल्यास उमेदवारांनी नवी मुंबई पोलिस नियंत्रण कक्ष किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.