राज्य पोलिस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून नाशिक ग्रामीण पोलिस दलात २० फेब्रुवारीपासून मैदानी चाचण्या घेण्यात येणार आहेत. शिपाई व वाहनचालक पदांसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार असून गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष दक्षता पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाच्या भरतीत पारदर्शकता वाढवण्यासाठी उमेदवारांच्या ‘चेस्ट’ क्रमांकासोबत ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, नाशिक ग्रामीण पोलिस दलात २१० शिपाई, ५२ चालक तर कारागृह विभागात ११८ शिपाई अशा एकूण ३८० पदांसाठी भरती होणार आहे. २०२२ ते २०२५ या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अखेरची संधी देण्यात आल्याने राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. नाशिक शहरात सध्या पदे रिक्त नसल्याने तेथे भरती जाहीर करण्यात आलेली नाही.
मैदानी चाचणीचे स्वरूप
- १६०० मीटर धावणे (पुरुष) – २० गुण
- ८०० मीटर धावणे (महिला) – २० गुण
- १०० मीटर धावणे – १५ गुण
- गोळाफेक – १५ गुण
शारीरिक पात्रता निकष
- उंची: महिला – १५५ सेमी, पुरुष – १६५ सेमी
- छाती (पुरुष): न फुगवता ७९ सेमी, फुगवून ८५ सेमी
१६०० मीटर (पुरुष) व ८०० मीटर (महिला) धावण्याच्या चाचणीवेळी अचूक वेळ नोंदवण्यासाठी RFID प्रणालीचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक उमेदवाराच्या ‘चेस्ट’ क्रमांकासोबत RFID टॅग लावण्यात येईल, ज्यामुळे वेळेची अचूक नोंद होईल व कोणत्याही प्रकारच्या फेरफाराला आळा बसेल.
बायोमॅट्रिकद्वारे पारदर्शकता
भरती प्रक्रियेत उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी ‘बायोमॅट्रिक’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. मैदानी चाचणी तसेच लेखी परीक्षेदरम्यान बायोमॅट्रिक उपस्थिती नोंदवली जाईल. यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यंदा बृहन्मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व ठिकाणी लेखी परीक्षा एकाच दिवशी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांनी विविध जिल्ह्यांत अनेक अर्ज करण्याची शक्यता कमी होईल आणि गुणवत्ता यादीतील स्पर्धा अधिक काटेकोर होईल.
दरम्यान, मागील दोन वर्षांत झालेल्या भरतीत नियुक्त झालेले कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. आता होणाऱ्या नव्या भरतीमुळे आगामी सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाला नव्या मनुष्यबळाचे बळ मिळणार आहे.

Comments are closed.