नाशिक महानगरपालिकेत तब्बल ३ हजारांहून अधिक पदं रिक्त असतानाही केवळ ३०० जागांसाठीच सरळसेवा भरती सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय पाहून अनेक कर्मचारी संघटनांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते, पूल, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापनाची कामे होणार आहेत. त्यामुळे तांत्रिक मनुष्यबळाची तातडीने आवश्यकता भासत आहे. याच कारणामुळे शासनाने महापालिकेला स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागात सरळसेवा पद्धतीने भरतीस परवानगी दिली आहे.
या भरतीत ११४ अभियंता पदं (सहायक व कनिष्ठ अभियंता) तसेच १८६ फायरमन व चालक पदं मिळून एकूण ३०० जागांची भरती करण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया १० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन सुरू राहील.
महापालिकेच्या आस्थापनेवर मंजूर ७०८२ पदांपैकी ३,००० पेक्षा अधिक पदं सध्या रिक्त आहेत. परंतु सर्व जागा भरल्यास महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त होईल, म्हणून नगरविकास विभागाकडून पूर्वी परवानगी मिळत नव्हती. आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही अट शिथील करण्यात आली आहे.
महापालिकेकडून २०२२ मध्येच ७०६ पदांच्या भरतीची योजना तयार होती, पण सरकारकडून परवानगी न मिळाल्याने ती थांबवण्यात आली. मात्र, आता तांत्रिक मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे शासनाने अखेर भरतीला हिरवा कंदील दाखवला आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: १ डिसेंबर २०२५
- विभाग: स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन
- पदसंख्या: ३०० (अभियंता, फायरमन, चालक)
- भरती पद्धत: सरळसेवा (Direct Recruitment)
अधिक माहितीसाठी नाशिक महानगरपालिकेची अधिकृत संकेतस्थळ भेट द्या आणि जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Comments are closed.