महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा ८ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये सुमारे ९० लाख ४१ हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी २,००० रुपये DBT द्वारे वर्ग केले जाणार आहेत.

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून दिला जाणारा हा निधी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. आधार लिंकिंग आणि ई-केवायसी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना हा हप्ता विनाअडथळा मिळणार आहे.
दरम्यान, यावेळी लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली असून यापूर्वी ९६ लाख असलेली संख्या आता ९० लाखांवर आली आहे. सरकारने केलेल्या काटेकोर छाननीमुळे मृत लाभार्थी, दुहेरी लाभ घेणारे आणि अपात्र शेतकरी यांना यादीतून वगळण्यात आले आहे. विशेषतः ‘एक कुटुंब, एक लाभार्थी’ हा नवा नियम लागू करण्यात आला असून, पती-पत्नी दोघांच्या नावावर शेती असल्यास आता केवळ एकालाच लाभ मिळणार आहे.
तसेच आयकर भरणारे, सरकारी सेवेत असलेले, सेवा क्षेत्रातील कर्मचारी आणि मर्यादेपेक्षा जास्त पेन्शनधारक शेतकरी या योजनेतून वगळले जात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार जानेवारी महिन्यात हा हप्ता वितरीत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी सीड आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून ८ व्या हप्त्याचा लाभ वेळेवर मिळू शकेल.

Comments are closed.