राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. मनाली क्षीरसागर यांची नियुक्ती होऊन दीड महिना उलटला असला, तरीही प्र-कुलगुरूंसह इतर महत्त्वाच्या पदांच्या नियुक्त्या अद्याप रखडल्या आहेत. विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही पदे अजूनही रिक्त असल्याने, नेमक्या कोणत्या कारणामुळे या नियुक्त्यांना विलंब होत आहे, याबाबत विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य आणि चर्चा सुरू आहे.

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूपद अनेक महिन्यांपर्यंत रिक्त होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर ३ डिसेंबर रोजी डॉ. मनाली क्षीरसागर यांनी पूर्णवेळ कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर प्र-कुलगुरू, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक, परीक्षा संचालक तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता अशा महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या होतील, अशी अपेक्षा होती. ही सर्व पदे ‘को-टर्मिनस’ स्वरूपाची असून कुलगुरूंच्या कार्यकाळापर्यंत संबंधित अधिकारी पदावर कार्यरत राहतात. मात्र, सध्या या पदांवर अनेक महिन्यांपासून अतिरिक्त कार्यभार देऊनच कामकाज चालवले जात आहे.
नव्या कुलगुरूंच्या नियुक्तीनंतर विद्यापीठातील प्रशासकीय यंत्रणा गतिमान होईल, अशी अपेक्षा असतानाही दीड महिना उलटून गेला तरी प्र-कुलगुरूंसह अन्य पदांवरील नियुक्त्यांबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नाही. या पदांसाठी अनेक इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले असून, काहींनी प्रभावशाली व्यक्तींशी संपर्कही साधल्याची चर्चा आहे. विशेषतः प्र-कुलगुरूपदी नेमकी कोणाची निवड होणार, याबाबत विद्यापीठ वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.
दरम्यान, कुलगुरूंची नियुक्ती झाल्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशन आणि त्यानंतर महापालिका निवडणुकांचा गदारोळ सुरू झाल्याने या नियुक्त्यांचा विषय मागे पडला. आता पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकांचे वातावरण तयार होत असल्याने, नागपूर विद्यापीठाला महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पूर्णवेळ कुलगुरू असलेल्या डॉ. क्षीरसागर या प्रभारी अधिकाऱ्यांच्या मदतीनेच विद्यापीठाचा कारभार सांभाळत आहेत.
याबाबत प्रतिक्रिया देताना कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी स्पष्ट केले की, “प्र-कुलगुरूंसह इतर पदांवरील नेमणुकांबाबत अद्याप प्रक्रिया सुरू झालेली नाही. सध्या विद्यापीठाच्या परीक्षा आणि अन्य महत्त्वाचे उपक्रम सुरळीतपणे पार पाडण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र, पुढील परीक्षांपूर्वी पूर्णवेळ परीक्षा संचालक मिळावा, यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.”
यामुळे नागपूर विद्यापीठातील प्रशासकीय नियुक्त्यांचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच असून, प्र-कुलगुरूंची नियुक्ती कधी होणार? हा प्रश्न कायम आहे.

Comments are closed.