राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा २०२५ अखेर नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून परीक्षांच्या तारखांबाबत संभ्रम होता. अखेर विद्यापीठ प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
या परीक्षा विद्यापीठ परिक्षेत्रातील १३६ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येतील. मागील वर्षी १६ नोव्हेंबरपासून परीक्षा झाल्या होत्या, मात्र यावर्षी एक आठवडा उशिराने — म्हणजेच २० नोव्हेंबरनंतर नियमित परीक्षा सुरू होतील. तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची शक्यता आहे.
विद्यापीठ प्रशासनाने पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दरवर्षी गोंधळ आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिक काळजी घेण्यात येत आहे. जानेवारीपासून व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे.
दरम्यान, यावर्षी परीक्षांचे संचालन नवीन कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. यापूर्वी प्रोमार्क कंपनीकडे असलेले हे काम आता नव्या कंपनीकडे दिल्याने काही प्रमाणात गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments are closed.