महाराष्ट्राला सर्वात लांब पल्ल्याची वंदेभारत एक्स्प्रेस मिळणार आहे. अजनी-नागपूर ते पुणे दरम्यान धावणारी ही नवी गाडी सोमवार, ११ ऑगस्ट रोजी पुण्यातून नागपुरात दाखल होणार असून मंगळवार, १२ ऑगस्टपासून ती नियमित धावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार, १० ऑगस्ट रोजी या गाडीचे आभासी पद्धतीने उद्घाटन होईल. ही महाराष्ट्रातील बारावी वंदेभारत एक्स्प्रेस असून, ती ८८१ किमी अंतर फक्त ७३ किमी प्रतितास सरासरी वेगाने पार करेल.

थांबे व वेळापत्रक
ही एक्स्प्रेस अजनी, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौड कॉर्ड लाइन येथे थांबेल. पुण्याहून सकाळी ६.२५ वाजता सुटून ती संध्याकाळी ६.२५ वाजता अजनीला पोहोचेल. परतीचा प्रवास अजनीहून सकाळी ९.५० वाजता सुरू होऊन रात्री ९.५० वाजता पुण्यात समाप्त होईल. आठवड्यातून सहा दिवस सेवा उपलब्ध असून, पुण्याहून मंगळवारी आणि अजनीहून सोमवारी गाडी धावणार नाही.
संत नगरी शेगावचा थांबा
या एक्स्प्रेसला शेगाव येथे थांबा मंजूर झाला आहे. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या विनंतीवरून रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी तातडीने यास मान्यता दिली. ७ ऑगस्टला याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले असून, भाविकांनी या निर्णयाचा आनंद व्यक्त केला आहे.
डब्यांची क्षमता व भाडे
एकूण आठ डब्यांची ही ट्रेन ५९० प्रवाशांच्या आसन क्षमतेसह धावेल. यात सात चेअर कार (₹१,५०० प्रति आसन) आणि एक एक्झिक्युटिव्ह चेअर कार (₹३,००० प्रति आसन) असे विभाग आहेत. सर्व डबे वातानुकूलित असून, मोठ्या पॅनोरामिक खिडक्या, एलईडी लाईटिंग, स्वयंचलित दरवाजे, बायो-व्हॅक्युम शौचालये आणि सीसीटीव्ही निरीक्षण यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील.
ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंग
गाडीचे ऑनलाइन तिकिट आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून मिळेल, तर प्रत्यक्ष (ऑफलाइन) बुकिंगची सुविधा १० ऑगस्टपासून सुरू होईल. यामुळे प्रवासी आगाऊ नियोजन करू शकतील. खास करून सण-उत्सव काळात, खासगी बस आणि विमानांच्या वाढलेल्या भाड्यांवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
उद्घाटनाचा खास दिवस
१० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता उद्घाटन सोहळ्यानंतर शालेय विद्यार्थी आणि मान्यवर पाहुण्यांसाठी विशेष दौरा आयोजित केला आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाचा अनोखा अनुभव देणे आणि या नव्या गाडीची ओळख करून देणे हा आहे.
व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी वरदान
या गाडीमुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील व्यावसायिक, विद्यार्थी, व्यापारी आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. प्रवासाचा वेळ कमी होईल, तसेच आरामदायी व जलद सेवा मिळेल. या मार्गामुळे व्यापारी देवाणघेवाण आणि पर्यटनाला चालना मिळेल, असा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
वंदेभारतचे वाढते जाळे
सध्या देशभरातील २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १४४ मार्गांवर ७२ वंदेभारत एक्स्प्रेस धावत आहेत. २०२८ पर्यंत हे जाळे २०० हून अधिक गाड्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. नागपूर-पुणे वंदेभारत या विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Comments are closed.