नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यानुसार कायदा व सुव्यवस्थेच्या देखरेखीसाठी पोलिस दलाची संख्याही वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. नागपूर पोलिस आयुक्तालयासाठी 391 आणि नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयासाठी 2,187 नवीन पोलिस पदांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात पोलिस महासंचालकांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. वाढत्या जबाबदाऱ्यांचा ताण सध्या कार्यरत पोलिसांवर मोठ्या प्रमाणात असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस दलाची भरती तातडीने होणे गरजेचे आहे.
या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गृह विभागाला आदेश दिले आहेत की, 28 एप्रिलपर्यंत या प्रस्तावावर निर्णय घेऊन तो न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणावा. नागपूर पोलिस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाढ झाल्याने पोलिस ठाण्यांवरील जबाबदाऱ्या देखील वाढल्या आहेत.
ग्रामीण भागात सध्या 22 पोलिस ठाणे आणि 6 उप-विभाग कार्यरत आहेत, तर नागपूर शहरात 36 पोलिस ठाणे आणि 5 उप-विभाग कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन पोलिस पदे मंजूर करून लवकरात लवकर भरती करणे आवश्यक आहे.