नागपूर शहराचा वेगाने होत असलेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे पोलिस विभागावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. मात्र, या वाढत्या जबाबदाऱ्यांदरम्यान पोलिस आयुक्तालयात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या १२९ अधिकारी पदांसह एकूण ८८१ पदांचा बॅकलॉग असल्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागपूरमध्ये सध्या ३५ पोलिस ठाणी कार्यरत असून भविष्यात आणखी ५ नवीन ठाण्यांचा प्रस्ताव आहे. मात्र, ठाण्यांची संख्या वाढत असताना मंजूर पदांमध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत चालला आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक या सर्व स्तरांवर मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत.
विशेष म्हणजे, पोलिस ठाण्यांचा कणा मानल्या जाणाऱ्या अमलदारांचीही जवळपास ९२९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाज, गुन्हे तपास, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या तक्रारी हाताळण्यात अडचणी येत आहेत. तज्ज्ञांच्या मते, या बॅकलॉगमुळे पोलिस व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून तातडीने भरती करणे आवश्यक आहे.
नागपुरात बदली झाल्यानंतर अनेक अधिकारी येथे सेवा देण्यास अनुत्सुक असतात, त्यामुळे रिक्त पदांची समस्या अधिक गंभीर बनते. त्यामुळे अधिकाऱ्यांना नागपुरात सेवा देणे बंधनकारक करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या भरती प्रक्रियेतून ५९५ पोलिस अमलदार मिळणार असले तरी ते पूर्णपणे रुजू होण्यासाठी काही महिने लागणार आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तातडीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे.

Comments are closed.