नागपूर महानगरपालिका मध्ये तब्बल ४८ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेतील मंजूर १७,९८१ पदांपैकी सध्या केवळ ९,३२२ कर्मचारी कार्यरत असून तब्बल ८,६५९ पदे रिक्त आहेत. या मोठ्या तुटवड्यामुळे नागरी प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय आढावा बैठकीत ही बाब समोर आली. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची गंभीर दखल घेत आयुक्तांनी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रलंबित नियुक्त्यांचे प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठवण्याचे आदेशही देण्यात आले.
महापालिकेला राज्य संवर्गातील सुमारे १९ अधिकाऱ्यांची आवश्यकता असून, त्यासाठी प्रतिनियुक्तीवर अधिकारी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यास सांगितले आहे. सामान्य प्रशासन व विधी विभागाच्या बैठकीत उपायुक्त निर्भय जैन यांनी माहिती देताना सांगितले की, सुधारित प्रशासकीय रचनेनुसार महापालिकेत वर्ग १ ते वर्ग ४ अशा २०५ संवर्गांचा समावेश आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांमुळे अनेक विभागांचे कामकाज ठप्प होण्याच्या स्थितीत आहे.
यावेळी विधी अधिकारी सूरज पारोचे यांनी विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांचा आढावा सादर केला. बैठकीस अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, वैष्णवी बी, मुख्य अभियंता मनोज तळेवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.