नाशिक महानगरपालिका वैद्यकीय विभागात तब्बल ९३४ मंजूर पदांपैकी ६०५ पदे रिक्त असून, या रिक्त पदांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाढती लोकसंख्या, नव्याने सुरू होत असलेली आरोग्य केंद्रे आणि येणाऱ्या सिंहस्थ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. शासनाकडून आस्थापना खर्चाच्या कारणास्तव भरतीला हिरवा कंदील मिळत नसल्याने आता वैद्यकीय विभागाने मानधनावर तज्ज्ञ डॉक्टर व इतर पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेकडे सध्या पाच मोठी रुग्णालये, तब्बल ३० शहरी आरोग्य केंद्रे, नव्याने सुरू होणारी १०५ आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि ‘आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत २५ केंद्रे आहेत. एवढ्या मोठ्या आरोग्य यंत्रणेवर ३२९ कार्यरत पदांवर कामकाज सुरू असून, ६०५ पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवेत खूपच तुटवडा जाणवत आहे.
करोना काळात महापालिकेला विशेष मंजुरी देऊन ३४७ पदे भरण्यात आली होती. मात्र, ही भरती तात्पुरतीच होती. मुदतवाढ न मिळाल्याने त्या डॉक्टर, परिचारिका आणि एएनएमच्या पदेही रिक्त झाली. परिणामी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा निर्माण झाली असून, रुग्णसेवेत गंभीर अडचणी येत आहेत.
महत्त्वाच्या पदांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्तता आहे. उदाहरणार्थ, वैद्यकीय अधिकाऱ्यांची ७५ पदे, स्त्रीरोगतज्ज्ञांची १६ पदे, बालरोगतज्ज्ञांची १६ पदे, भूलतज्ज्ञांची ९ पदे, शल्यचिकित्सकांची ८ पदे, तर त्वचारोग व क्ष-किरण तज्ज्ञांच्या काही पदांसह एकूण १४२ तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर नर्स, आया, वॉर्डबॉय अशा सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या शेकडो पदांवरही कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे.
या पदांसाठी वारंवार जाहिराती दिल्या जात असून, मानधनात वाढ करूनही तज्ज्ञ डॉक्टर महापालिकेत दाखल होत नाहीत. खाजगी रुग्णालये व इतर संधींच्या तुलनेत महापालिकेतील सेवा आकर्षक नसल्याने ही अडचण कायम राहते. यामुळे प्रशासनाने आता पुन्हा मानधन वाढवून आणि वेगळ्या अटींसह भरती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधीक्षक डॉ. विजय देवकर यांनी सांगितले की, सिंहस्थ सोहळ्यापूर्वी वाढत्या रुग्णसंख्येला तोंड देण्यासाठी ही पदे भरणे आवश्यक आहे. त्यामुळे मानधनावर भरतीसंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.
शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात पोहोचली असताना केवळ ३२९ कर्मचाऱ्यांच्या बळावर वैद्यकीय विभाग चालवला जात आहे, ही बाब गंभीर आहे. अशा परिस्थितीत सिंहस्थासारख्या ऐतिहासिक सोहळ्यात लाखो भाविकांचे आरोग्यसुरक्षेचे प्रश्न उभे राहू शकतात. त्यामुळे ही मानधन भरती तातडीने होणे आवश्यक आहे, असा सूर वैद्यकीय विभागातून उमटत आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला मोठा आर्थिक भार असून, आस्थापना खर्चामुळे शासन पातळीवरून नियमित भरतीला मान्यता मिळत नाही. त्यामुळे सध्याचा उपाय म्हणून मानधनावर पदभरती करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, ही तात्पुरती सोय असून, वैद्यकीय सेवांचा दर्जा टिकवण्यासाठी नियमित पदभरती अनिवार्य असल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments are closed.