महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीला अखेर मुहूर्त; २५ जानेवारीला ऑनलाइन परीक्षा! | Municipal Junior Engineer Exam on Jan 25!

Municipal Junior Engineer Exam on Jan 25!

लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या सलग आचारसंहितेमुळे रखडलेली पुणे महापालिकेची बहुप्रतिक्षित कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा आता रविवार, २५ जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

Municipal Junior Engineer Exam on Jan 25!

महापालिकेत अभियंता श्रेणीसह विविध विभागांतील हजारो पदे रिक्त असल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत होता. भरतीवरील बंदी उठल्यानंतर प्रक्रिया सुरू झाली असली, तरी लोकसभा निवडणूक, मराठा आरक्षणाचा मुद्दा, शासनाची मंजुरी, तसेच आयबीपीएससोबतचा करार संपल्याने ही भरती वारंवार स्थगित झाली होती.

मार्च २०२४ मध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानंतर नव्याने करार झाल्यावर उमेदवारांना अर्जात बदल करण्याची संधी देण्यात आली. मात्र, विधानसभा आणि नंतर महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली. अखेर १५ जानेवारी रोजी राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्या आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर झाल्याने आचारसंहिता शिथिल झाली आहे. त्यामुळे कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू झाले असून भरती परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या वर्ग-तीनमधील १६९ पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्र व वेळेबाबतची माहिती उमेदवारांना लवकरच एसएमएस व ई-मेलद्वारे कळवली जाणार असून, यूजर आयडी व पासवर्डच्या आधारे प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. प्रवेशपत्र किंवा अन्य अडचणी असल्यास उमेदवारांनी १८००२२२३६६ किंवा १८००१०३४५६६ या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.