मागील काही वर्षांत मराठी माध्यमांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये सातत्याने होणाऱ्या शब्दचुका, अशुद्ध भाषा आणि इंग्रजीतील प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने महत्त्वाचा निर्णय घेत मराठी माध्यमांच्या सर्व प्रश्नपत्रिका शुद्ध मराठीत छापण्याबाबत अधिकृत परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना आता अधिक स्पष्ट आणि अचूक प्रश्नपत्रिका मिळणार आहेत.

अलीकडे द्वितीय वर्ष मराठी विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत अनेक प्रश्न थेट इंग्रजी भाषेत दिल्याचे प्रकार उघडकीस आले होते. याबाबत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर युवासेनेने विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा करत कुलसचिवांना निवेदन दिले होते. या मुद्द्याची गंभीर दखल घेत विद्यापीठाने तातडीने परिपत्रक निर्गमित केले.
युवासेनेच्या दणक्यानंतर कुलसचिवांनी, मराठी माध्यमाच्या सर्व परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका शुद्ध मराठीतच तयार करण्यात याव्यात, असे स्पष्ट आदेश दिले. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत युवासेनेचे आभार मानले आहेत.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे आलेल्या तक्रारींच्या आधारे युवासेना सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरुखकर, प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी विद्यापीठाचे कुलसचिव प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणीही केली होती.
परिपत्रकानुसार, यापुढे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचे मराठीत भाषांतर करून त्या हस्तलिखित कक्षात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच इंग्रजीतील प्रश्नपत्रिकांचे मराठीत रूपांतर करताना संबंधित विषयाचे अध्यक्ष, अनुवादक आणि परीक्षक यांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

Comments are closed.