महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांना 23 मार्च 2026 पासून सुरुवात होत असून या परीक्षा 10 एप्रिल 2026 पर्यंत चालणार आहेत. राज्यभरातील सुमारे 175 परीक्षा केंद्रांवर या परीक्षा पार पडणार असून, जवळपास 43,928 विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. परीक्षा सकाळी 9 वाजता आणि दुपारी 2 वाजता अशा दोन सत्रांमध्ये घेतल्या जाणार आहेत.

पदवी स्तरावर MBBS (प्रथम ते चतुर्थ वर्ष), तसेच BAMS, BUMS, BHMS या आयुष अभ्यासक्रमांच्या विविध वर्षांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. याशिवाय BSc Nursing च्या प्रथम सत्राच्या परीक्षांनाही सुरुवात होणार आहे. पदव्युत्तर स्तरावर आयुर्वेद व युनानी शाखेतील MD आणि MS अंतिम वर्षांच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. विद्यापीठाशी संलग्न इतर अभ्यासक्रमांच्याही परीक्षा याच कालावधीत पार पडतील.
परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी विद्यापीठाने ऑनलाइन प्रणालीचा वापर कायम ठेवला आहे. प्रश्नपत्रिका थेट परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पाठविणे आणि उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून तपासणी करणे ही पद्धत यावर्षीही सुरू राहणार आहे. त्यामुळे परीक्षा व्यवस्थापन अधिक सुलभ व विश्वासार्ह होत असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले आहे.

Comments are closed.