राज्य परिवहन महामंडळात (एसटी) मोठी भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या तब्बल ८ हजार बसगाड्यांसाठी चालक आणि सहाय्यक मनुष्यबळाची गरज असल्याने कंत्राटी पद्धतीने १७,४५० पदांसाठी भरती केली जाणार आहे.
ही घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. त्यांनी सांगितले की, २ ऑक्टोबरपासून या भरतीसाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. भरती होणाऱ्या चालक व सहायकांना सुमारे ३० हजार रुपये मासिक वेतन आणि प्रशिक्षण देण्यात येईल.
एसटी महामंडळाच्या ३००व्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविण्याकरिता ३ वर्षांसाठी भाडेतत्त्वावरील (कंत्राटी) नियुक्ती केली जाणार आहे. ही प्रक्रिया विभागनिहाय राबविली जाईल.
सरनाईक म्हणाले की, या भरतीमुळे हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार मिळणार असून प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल.
सध्या एसटीकडे १५,७७४ बसगाड्या असून, मनुष्यबळाची संख्या ८७ हजारांवर आली आहे. त्यामुळे ही मेगाभरती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Comments are closed.