२१ डिसेंबरचा पेच! – MPSC vs Vote Count – Dec 21!

MPSC vs Vote Count – Dec 21!

नगरपालिका व नगर पंचायतींच्या २ आणि २० डिसेंबरला पार पडणाऱ्या मतदानाची मतमोजणी २१ डिसेंबरला एकाच वेळी होणार आहे. याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ‘ब’ अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा नियोजित करण्यात आली आहे.

MPSC vs Vote Count – Dec 21!त्यामुळे एकाच दिवशी निवडणूक यंत्रणा आणि स्पर्धा परीक्षा येऊन ठेपल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

जिल्हा स्तरावर MPSC परीक्षेचे संपूर्ण व्यवस्थापन जिल्हाधिकारी व महसूल विभागावर अवलंबून असते. मात्र मतमोजणीच्या दिवशी हेच अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे निवडणूक प्रक्रियेत गुंतलेले असणार आहेत. अशा परिस्थितीत परीक्षा केंद्रांवरील नियंत्रण, सुरक्षा व व्यवस्थापन कसे होणार, असा सवाल उमेदवार उपस्थित करत आहेत. परिणामी २१ डिसेंबरची परीक्षा होणार की पुढे ढकलली जाणार, याबाबत अनिश्चितता आहे.

दरवर्षी PSI, STI आणि ASO या पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. यंदा एकूण ६७४ जागांसाठी जाहिरात असून, त्यात PSIच्या ३९२, STIच्या २७९ आणि ASOच्या ३ पदांचा समावेश आहे. ही परीक्षा मूळतः ९ नोव्हेंबरला होणार होती; मात्र पूरस्थितीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्या विलंबाचा परिणाम आता डिसेंबरच्या वेळापत्रकावर दिसून येत आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने आधी २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी नियोजित केली होती. न्यायालयीन कारणांमुळे काही निवडणुका २० डिसेंबरला घेण्यात येणार असून, त्याची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे सर्व नगरपालिका व नगर पंचायतींचे निकाल एकाच दिवशी जाहीर होतील, आणि हाच दिवस MPSC परीक्षेचा ठरत असल्याने गोंधळ वाढला आहे.

या संदर्भात MPSCकडून माहिती घेतली असता, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक सुरू असून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले. विश्वासार्ह सूत्रांनुसार परीक्षा पुढे ढकलली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, ऐन परीक्षेच्या तोंडावर वारंवार बदल झाल्याने अभ्यासाचे आणि जीवनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडते. प्रवास, राहण्याची व्यवस्था व खर्च आधीच ठरवलेले असतात. त्यामुळे आयोगाने तात्काळ स्पष्ट निर्णय जाहीर करून अनिश्चिततेला पूर्णविराम द्यावा, ही उमेदवारांची ठाम मागणी आहे.

Comments are closed.