एमपीएससी PSI भरतीत अडथळा; २२८६ उमेदवारांची प्रतीक्षा, आज निर्णायक बैठक! | MPSC PSI recruitment delay; 2286 waiting!

MPSC PSI recruitment delay; 2286 waiting!

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षेला वर्ष उलटून गेले तरीही पुढील मैदानी चाचणी अद्याप प्रलंबित आहे. यामुळे तब्बल २२८६ प्रामाणिक उमेदवारांचे भविष्य सध्या टांगणीला लागले आहे. २०१ उमेदवारांनी केलेल्या गैरप्रकारामुळे ही भरती न्यायालयीन प्रक्रियेत अडकली असून, आज आयोगाची महत्वाची बैठक होत असून त्यात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

MPSC PSI recruitment delay; 2286 waiting!

६१५ पदांसाठी १० डिसेंबर २०२३ रोजी राज्यभरातील २७ हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी पूर्व परीक्षा दिली होती. त्यातून सुमारे ७४०० उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी मुख्य परीक्षा पार पडली. त्यानंतर मार्च-एप्रिल २०२५ पर्यंत मैदानी चाचणी अपेक्षित होती. मात्र, २०१ उमेदवारांच्या गैरप्रकारामुळे आयोगाने त्यांना तीन वर्षांसाठी अपात्र ठरवले. या निर्णयाविरोधात संबंधित उमेदवार न्यायालयात गेले. न्यायालयाने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार’ संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्याचे निर्देश दिले, त्यामुळे ही प्रक्रिया लांबली.

दरम्यान, पात्र उमेदवार सध्या पोलीस सेवेत कार्यरत असून, नोकरीसोबतच मैदानी चाचणीसाठी तयारी करत आहेत. अनेक उमेदवार खाजगी प्रशिक्षक, आहार व निवासासाठी दरमहा १० ते १२ हजार रुपये खर्च करत आहेत. मात्र, चाचणीला उशीर होत असल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत आहे. शिस्तबद्ध सेवेमुळे ते उघडपणे आपली व्यथा मांडू शकत नाहीत.

ऑक्टोबर २०२५ मध्ये होणारी चाचणी अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन आदेशानंतर १६ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘प्रशासकीय कारण’ देत चाचणी स्थगित करण्यात आली. नवीन वेळापत्रक जाहीर होईल असे सांगण्यात आले होते, मात्र अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे २०२३ पासून सुरू असलेली ही भरती २०२६ मध्ये तरी पूर्ण होईल का, अशी चिंता उमेदवार व्यक्त करत आहेत.

उमेदवारांनी आयोगाने लवकरात लवकर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मैदानी चाचणी घ्यावी, अशी मागणी केली आहे. आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर होईल आणि उमेदवारांना १५ ते २० दिवसांची तयारीची मुदत दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Comments are closed.