एमपीएससी अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरतीची जाहिरात उशिरा निघाल्यामुळे हजारो इच्छुक उमेदवार वयोमर्यादेच्या अडचणीत सापडले आहेत. या अन्यायाविरोधात आता काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून, वयोमर्यादेत तातडीने सवलत देण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी समाजमाध्यमांवरून उमेदवारांच्या बाजूने आवाज उठवला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट शब्दांत सरकारवर टीका करत म्हटले आहे की, PSI भरतीसाठी उमेदवारांनी वर्षानुवर्षे मेहनत, आर्थिक खर्च आणि कठोर तयारी केली आहे. मात्र शासनाच्या दिरंगाईमुळे त्यांनाच शिक्षा भोगावी लागत आहे.
सरकारच्या प्रशासकीय अपयशामुळे पात्र तरुण वयोमर्यादेबाहेर ढकलले जात असून, हा केवळ अन्याय नाही तर युवकांच्या भविष्याशी केलेला खेळ आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. पक्षाची ठाम मागणी आहे की PSI पदासाठी किमान एक वर्षांची वयोवाढ तात्काळ मंजूर करावी आणि वयोमर्यादा १ जानेवारी २०२५ या तारखेनुसार ग्राह्य धरावी.
या मागणीसाठी आतापर्यंत विविध पक्षांच्या ९० हून अधिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे निवेदने दिली असतानाही निर्णय न झाल्याने नाराजी वाढत आहे. सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास पुण्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे. तरुणांचा संयम संपत असून, याचे गंभीर सामाजिक आणि राजकीय परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा सपकाळ यांनी दिला आहे.
दरम्यान, वयोमर्यादेबाबत निर्णय प्रलंबित असतानाच एमपीएससीने गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करून वेळेआधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.