एमपीएससी गुणवत्ता यादी जाहीर; नीलेश महाजन राज्यात अव्वल! | MPSC Merit List Released!

MPSC Merit List Released!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सहायक प्राध्यापक, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या परीक्षेत नीलेश मनोहरराव महाजन यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या संवर्गाच्या मुलाखती ११ व १२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आल्या होत्या. ही गुणवत्ता यादी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर येथे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC Merit List Released!

आयोगाने स्पष्ट केले आहे की, ही यादी तात्पुरत्या स्वरूपाची असून उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांनुसार प्रमाणपत्र व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे काही उमेदवारांच्या शिफारशी किंवा गुणवत्ताक्रमात बदल होऊ शकतो अथवा काही उमेदवार अपात्र ठरू शकतात.

दरम्यान, राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. नव्याने स्थापन झालेल्या धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी आणि सातारा येथील महाविद्यालयांसह इतर महाविद्यालयांमधील पदांचा यात समावेश आहे. एमपीएससीमार्फत ५ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एकूण ७६५ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून परीक्षेनंतर आता तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

Comments are closed.