Maharashtra Public Service Commission (MPSC) कडून ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025’ संदर्भात परीक्षार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला या भरतीद्वारे एकूण ९३८ पदे भरण्यात येणार होती; मात्र आता शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त अतिरिक्त मागणीनुसार तब्बल ८०३ जागांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण पदसंख्या वाढून १७४९ झाली असून सुधारित तपशील आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

ही पूर्व परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर पार पडली होती. आधी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतच पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आता शासनाच्या सूचनेनुसार सुधारित पदसंख्या जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक अशा विविध पदांचा समावेश आहे. उद्योग निरीक्षकासाठी ९ पदे (वेतनश्रेणी S-13), तांत्रिक सहाय्यकासाठी ४ पदे (S-10), कर सहाय्यकासाठी ७३ पदे (S-8) आणि लिपिक-टंकलेखकासाठी सर्वाधिक १५४० पदे (S-6) उपलब्ध आहेत. याशिवाय दुय्यम निरीक्षक पदांसाठीही १२५ जागा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
उमेदवारांनी लक्षात घ्यावे की रिक्त पदांची संख्या व आरक्षण शासनाच्या निर्देशानुसार बदलू शकते. अंतिम निकालापर्यंत नवीन मागण्या समाविष्ट होण्याची शक्यता असल्याने अर्ज करताना ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच आरक्षणाचे फायदे फक्त महाराष्ट्रातील मूळ रहिवासी उमेदवारांनाच लागू होतील.
या निर्णयामुळे हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी ठरली आहे.

Comments are closed.