राज्यातील नगरपालिका निवडणुकांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट ब आणि गट क परीक्षांच्या तारखा बदलल्या होत्या. परंतु सुधारित नियोजनानुसार आता गट ब परीक्षा ४ जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे आणि याच दिवशी यूजीसी नेट परीक्षा असल्यामुळे अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत.

एमपीएससीने २१ डिसेंबरला होणाऱ्या गट ब परीक्षेच्या नियोजनात बदल करून ती ४ जानेवारीला ठेवली, तर गट क परीक्षा ११ जानेवारीला होणार असल्याचे जाहीर केले. मात्र या पुनर्नियोजनादरम्यान आयोगाने इतर परीक्षांचा विचार केला नाही, त्यामुळे एकाच दिवशी दोन महत्वाच्या स्पर्धा परीक्षा येण्याचा त्रास उमेदवारांना सहन करावा लागत आहे.
स्पर्धा परीक्षा असोसिएशनचे महेश घरबुडे म्हणाले की, आयोगामार्फत परीक्षांचे वेळापत्रक वेळेवर निश्चित केले जात नाही आणि अशा प्रकारच्या समस्या नेहमीच उद्भवतात. यामुळे आता उमेदवारांना कोणती परीक्षा द्यावी, असा मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
देशभरात ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान यूजीसी नेट परीक्षा आयोजित असल्याने ही समस्या अजून गंभीर झाली आहे. उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, आयोगाकडून यावर कधी निर्णय होईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments are closed.