शहरात महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच रविवारी (ता. ११) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पार पडली. निवडणुकीच्या रणधुमाळीत परीक्षा असल्याने नाशिकमधील परीक्षार्थ्यांची मोठीच तारांबळ उडाली. शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर एकूण ११ हजार ६५६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ८ हजार ८१० परीक्षार्थींनी प्रत्यक्ष हजेरी लावत परीक्षा दिली, तर २ हजार ८४६ उमेदवार गैरहजर राहिले.

निवडणुकीचा माहोल लक्षात घेता यंदा परीक्षार्थींना परीक्षेपूर्वी दीड तास आधी केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना एमपीएससीकडून देण्यात आल्या होत्या. येत्या आठवड्यात मतदान असल्याने रविवारी सुटीचा फायदा घेत उमेदवार, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने प्रचार रॅलींसाठी रस्त्यावर उतरले होते. प्रचार रॅली, वाहनांची वर्दळ आणि विविध कार्यक्रमांमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली होती.
या सर्व गोंधळात परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचताना अनेक परीक्षार्थ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. काही पारंपरिक परीक्षा केंद्रांच्या आसपास मोठे राजकीय उपक्रम असल्याने ती केंद्रे यावेळी परीक्षेसाठी वगळण्यात आली होती. तरीदेखील परीक्षा वेळेत रस्त्यांवरून जाणाऱ्या प्रचार वाहनांमुळे अनेक उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला.
परीक्षेची काठिण्य पातळी संमिश्र
परीक्षेच्या अवघडपणाबाबत परीक्षार्थींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. बहुतेक उमेदवारांच्या मते, वेळेत सर्व प्रश्न सोडवताना तारेवरची कसरत करावी लागली. विशेषतः सामान्य ज्ञानाचे प्रश्न तुलनेने अधिक कठीण असल्याचेही अनेकांनी नमूद केले.

Comments are closed.