एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती जाहिरातीला झालेल्या विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आले आहे. जाहिरात तब्बल सात महिने उशिरा प्रसिद्ध झाल्याने अनेक उमेदवार वयोमर्यादेमुळे अपात्र ठरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वयोमर्यादेत शिथिलता आणावी, अशी ठाम मागणी एमपीएससी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र भेट नाकारण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “विद्यार्थी आत्महत्येच्या तयारीत आहेत, तरीही मुख्यमंत्र्यांची भेट नाकारली जाते,” अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
यापूर्वी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्या वेळी “आजपर्यंत निर्णय घेऊ,” असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणताही शासन निर्णय जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की,
“PSI ची जाहिरात शासन धोरणामुळे उशिरा आली. वयोमर्यादा १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मोजली जात आहे, ती १ जानेवारी २०२५ पासून धरावी, अशी आमची मागणी आहे. अन्यथा अनेक विद्यार्थी अपात्र ठरत आहेत. गेल्या सात महिन्यांपासून आम्ही पाठपुरावा करतोय. ७० ते ८० आमदारांची पत्रे मुख्यमंत्र्यांकडे गेली आहेत. ४ जानेवारी रोजी परीक्षा असून सुमारे ४ लाख विद्यार्थी संभ्रमात आहेत.”
विद्यार्थ्यांनी सरकारला थेट सवाल केला आहे,
“विद्यार्थ्यांना काही झालं तर जबाबदारी कोण घेणार? आत्महत्या झाल्यावर सरकारला जाग येणार आहे का? आमच्या संयमाचा अंत का पाहताय?”
एका विद्यार्थिनीने भावनिक शब्दांत सांगितले,
“परिस्थितीचं गांभीर्य ओळखा, नाहीतर पोरं मरतील. आम्ही पोटतिडकीने सांगत आहोत.”
गेली १०–१२ वर्षे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत. परीक्षा तोंडावर असताना शासनाकडून स्पष्ट निर्णय न आल्यामुळे मोठ्या प्रमाणात मानसिक तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने शासन निर्णय जाहीर करून वयोमर्यादेबाबत स्पष्टता द्यावी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी एमपीएससी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

Comments are closed.