पुण्यात एमपीएससी संयुक्त पूर्वपरीक्षा (गट ‘ब’) 2025 मधील वयोमर्यादेच्या अटींविरोधात विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू असताना मनोज जरांगे यांनी ठाम भूमिका घेत शासनाला जाब विचारला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे स्वतःची कोणतीही चूक नसतानाही एक ते दीड लाख एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी अपात्र ठरत असतील.

तर ही गंभीर शोकांतिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनस्थळावरून थेट मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन करून “एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न तातडीने सोडवा” असा ठोस संदेश जरांगे यांनी दिला. नदीपात्रात हजारोंच्या संख्येने जमलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन सर्व नियोजित दौरे रद्द करत जरांगे अचानक पुण्यात दाखल झाले. संयुक्त पूर्वपरीक्षेतील अचानक बदल आणि 1 नोव्हेंबर 2025 ही वयोमर्यादा ग्राह्य धरल्याने अनेक पात्र उमेदवार अपात्र ठरत असल्याचा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
वयवाढीसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही परीक्षा तोंडावर असताना शासनाने निर्णय न घेतल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. आंदोलन दाबण्यासाठी पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, यावरही जरांगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवणे चुकीचे असून, अन्यथा येत्या महापालिका निवडणुकांत राजकीय व्यवस्थेला झटका दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शास्त्री रोडवरील आंदोलनादरम्यान विनापरवाना निदर्शने केल्याच्या आरोपाखाली 10 स्पर्धा परीक्षार्थींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
जवळपास 70–80 सर्वपक्षीय आमदार, खासदार व मंत्र्यांनी मागणी करूनही सरकार विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या मान्य करत नसेल, तर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नव्हता, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या उमेदवारांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अशी सरकारकडे ठाम मागणी करण्यात आली आहे.

Comments are closed.