महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जानेवारीमध्ये होणाऱ्या गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेची प्रक्रिया सुरू केली असली, तरी वयोमर्यादेच्या प्रश्नावर अद्याप स्पष्ट निर्णय झालेला नाही. तब्बल सात महिन्यांच्या विलंबाने जाहीर झालेल्या भरतीमुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले असून, संधी हुकण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
एका बाजूला परीक्षेची लगबग सुरू असताना, दुसऱ्या बाजूला वयाची अट शिथिल करण्याची मागणी जोर धरत आहे. विद्यार्थी संघटना तसेच राजकीय प्रतिनिधी सरकारकडे सातत्याने निवेदने देत आहेत. मात्र, परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही शासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने संभ्रम वाढला आहे.
आयोगाने ६७४ पदांसाठी महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची जाहिरात जुलैमध्ये प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस उपनिरीक्षक पदांचा समावेश आहे.
दरम्यान, आयोगाने परीक्षेच्या आयोजनाबाबत कडक सूचना जारी केल्या असून, प्रवेशपत्रांशिवाय परीक्षेला परवानगी दिली जाणार नाही. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर वेळेआधी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमभंग केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

Comments are closed.