मोर्शी आरोग्य यंत्रणा संकटात!-Morshi Health System in Crisis!

Morshi Health System in Crisis!

मोर्शी तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने संपूर्ण यंत्रणा अपुऱ्या मनुष्यबळावर चालवली जात आहे.

Morshi Health System in Crisis!परिणामी नागरिकांच्या आरोग्यसेवांवर थेट परिणाम होत असून अनेकांना खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे.

मोर्शी तालुका आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्यसेवक-सेविका, औषध निर्माण अधिकारी तसेच पंचायत समितीतील विस्तार अधिकारी (आरोग्य) अशी एकूण ३५ पदे रिक्त आहेत. नेरपिंगळाई व धामणगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे अनेक महिन्यांपासून रिक्त असून विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये परिचारिका आणि आरोग्य सेविकांची तीव्र कमतरता जाणवत आहे.

हिवरखेड, अंबाडा, विचोरी, खेड, रिद्धपूर, शिरसगाव, नेरपिंगळाई आदी भागांतील उपकेंद्रांमध्ये आवश्यक कर्मचारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. वेळेवर तपासणी व उपचार न झाल्याने आजार बळावण्याचा धोका वाढत असून शासकीय उपचारांऐवजी नागरिकांना महागड्या खासगी उपचारांचा आधार घ्यावा लागत आहे.

आरोग्य सेवा ही मूलभूत गरज असताना वर्षानुवर्षे पदे रिक्त ठेवली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मोर्शी तालुका आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी जोरदार मागणी नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे.

Comments are closed.