मिरा-भाईंदर महापालिकेतील ३५८ पदभरतीला स्थगिती — मुख्यमंत्री फडणवीसांचा आदेश! | Fadnavis Halts Mira-Bhayandar Recruitment!

Fadnavis Halts Mira-Bhayandar Recruitment!

मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील ३५८ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू होती. मात्र, या भरतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. कारण, कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न अद्याप न सुटल्याने, तो निकाली लागेपर्यंत नवीन भरती थांबवावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली होती.

Fadnavis Halts Mira-Bhayandar Recruitment!

गेल्या काही वर्षांत पालिका सेवेतील अनेक कर्मचारी निवृत्त झाल्याने, उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. त्यामुळे वर्ग तीन आणि चारमधील रिक्त पदे भरण्यासाठी दोन वर्षांपासून हालचाली सुरू होत्या. अखेर २२ ऑगस्ट रोजी विविध विभागातील २७ संवर्गांतील ३५८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि काही पदांसाठी परीक्षा देखील घेण्यात आल्या.

मात्र, ही भरती झाल्यास पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदांवर बढती मिळू शकणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी सुधारित सेवा प्रवेश नियमावली तयार होईपर्यंत भरती थांबवावी, अशी मागणी केली.

याशिवाय अग्निशमन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही या भरतीमुळे बेरोजगारीचा धोका निर्माण होऊ शकतो, असा मुद्दा पुढे आला. सर्व बाबींचा विचार करून स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लेखी मागणी केली, आणि त्यानुसार नगरविकास विभागाला भरती स्थगित करण्याचे निर्देश देण्यात आले.

सध्या पालिकेकडे राज्य सरकारकडून याबाबतची अधिकृत माहिती आलेली नसली, तरी सुरू असलेली भरती प्रक्रिया तात्पुरती थांबवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments are closed.