नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्याने औद्योगिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बदली आदेश रद्द करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी मुंबई येथील मुख्यालयात धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली व्यवसाय सुलभतेबाबत बैठक झाली होती. या बैठकीत उद्योजकांनी महामंडळाच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी मांडल्या होत्या. विशेषतः औद्योगिक भूखंडाच्या त्रिपक्षीय करारासाठी दलालांमार्फत पैशांची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात आला होता, ज्यामुळे प्रकरणाची दखल मुख्यालयाने तातडीने घेतली.
यानंतर सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना नाशिकला पाठवण्यात आले. त्यांनी दोन दिवस तळ ठोकून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली, प्रलंबित कामांचा आढावा घेतला तसेच उद्योजकांशीही चर्चा केली.
या तपासणीनंतर प्रादेशिक कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांना मुंबई मुख्यालयात बदलीचे तोंडी आदेश देण्यात आल्याचे समजते आणि त्याचे लेखी आदेश काढण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, उद्योजकांनी काही मुद्द्यांवर गैरसमज झाल्याचे स्पष्टीकरण दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासासंदर्भात नेमकी कोणती चर्चा झाली आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींचा नेमका संदर्भ काय, याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

Comments are closed.