राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘एमएचटी-सीईटी 2025’ (MHT-CET 2025) परीक्षेचा निकाल अखेर १६ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या तात्पुरत्या तारखांनुसार, इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या PCM आणि PCB गटांच्या दोन्ही परीक्षांचे निकाल १६ जूनला प्रसिद्ध होणार आहेत. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या पुढच्या टप्प्यासाठी दिशा मिळणार आहे.
या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांच्या आधारे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार आहे. CET सेलकडून दरवर्षी राज्यभरातील विविध महत्त्वाच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि यंदाही ती प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. यंदाच्या परीक्षेला लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता आणि त्यामध्ये केवळ नाशिक जिल्ह्यातूनच २७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
CET सेलने केवळ MHT-CET च नव्हे तर इतर महत्त्वाच्या अभ्यासक्रमांच्या निकालांच्याही तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बीबीसीए (BBCA), बीबीए (BBA), बीएमएस (BMS), बीबीएम (BBM) यांचे निकाल ४ जून रोजी प्रसिद्ध होणार आहेत. याशिवाय, विधी शाखेतील पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाचा निकालही ४ जून रोजी जाहीर होणार असून विद्यार्थ्यांनी CET सेलच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
तसेच, बी. डिझाइन (B.Design) अभ्यासक्रमाचा निकाल ९ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. हा अभ्यासक्रम खासकरून सर्जनशील क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असून, दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी या कोर्ससाठी CET परीक्षेत सहभागी होतात. यंदाही त्या अभ्यासक्रमाचा निकाल निश्चित तारखेस जाहीर होणार आहे.
विधी तीन वर्षे अभ्यासक्रम (LLB 3 years) घेणाऱ्या उमेदवारांसाठीही महत्त्वाची माहिती आहे. या अभ्यासक्रमाचा निकाल १७ जून रोजी CET सेल जाहीर करणार आहे. त्यामुळे या तारखेकडेही विधीच्या क्षेत्रात पुढे जाण्याची इच्छा असणारे विद्यार्थी डोळे लावून बसले आहेत.
या सर्व निकालांच्या तारखा CET सेलने ‘तात्पुरत्या’ म्हणून जाहीर केल्या असून, निकाल प्रत्यक्षात कधी लागेल हे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी वेळोवेळी cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर भेट देत रहाणे आवश्यक आहे. कोणताही गैरसमज टाळण्यासाठी आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
एकूणच, राज्यातील प्रवेश प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे CET परीक्षा आणि तिचा निकाल. यामुळेच, विद्यार्थ्यांनी व पालकांनी CET सेलच्या वेबसाइटवर सतत लक्ष ठेवावे आणि निकाल जाहीर होताच पुढील प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी, हीच वेळेची गरज आहे.