देशातील वैद्यकीय पदव्युत्तर (PG) शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) यंदा तब्बल ४,१४० नव्या पदव्युत्तर जागांना मान्यता दिली असून, या जागांचा समावेश प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत होण्याची शक्यता आहे.
पहिली प्रवेशफेरी नुकतीच पार पडली असून, पुढील फेरीच्या तयारीदरम्यान ही वाढ महत्त्वाची ठरणार आहे. सध्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये PG जागा कमी असल्याने तीव्र स्पर्धा निर्माण होते आणि अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. या पार्श्वभूमीवर, देशभरात सुमारे ५५ टक्क्यांची वाढ महत्त्वाची मानली जात आहे.
राज्यनिहाय पाहता कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांत मोठ्या प्रमाणात जागा वाढल्या आहेत. महाराष्ट्रालाही १८१ नव्या PG जागांचा लाभ मिळाला असून, यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या संधी वाढणार आहेत.
महाराष्ट्रात विशेषतः त्वचारोग, रेडिओ निदान, शस्त्रक्रिया, श्वसनरोग, रेडिएशन ऑन्कोलॉजी, ईएनटी, नेत्ररोग, मानसोपचार, बालरोग, अस्थिरोग, भूलतज्ज्ञ तसेच प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र या अभ्यासक्रमांमध्ये जागा वाढविण्यात आल्या आहेत. संबंधित राज्ये व वैद्यकीय महाविद्यालयांकडील औपचारिक मान्यता प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास, या नव्या जागा लवकरच प्रवेशप्रक्रियेत समाविष्ट होतील.

Comments are closed.