नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील मानवबळाची गंभीर कमतरता माहिती अधिकारातून समोर आली आहे. विभागात मंजूर ९३४ पदांपैकी तब्बल ६०५ पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या लोकसंख्येचा ताण, शहरातील आरोग्य सुविधा विस्तार आणि आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिकच आव्हानात्मक ठरत आहे.

सध्याच्या स्थितीत मनपाच्या अखत्यारीत ५ मोठी रुग्णालये व ३० शहरी आरोग्य केंद्रे सुरू असून, आणखी १०५ आरोग्यवर्धिनी केंद्रे व २५ ‘आपला दवाखाना’ केंद्रे सुरू करण्याची योजना आहे. मात्र, सध्या फक्त ३२९ कर्मचारी कार्यरत असल्याने वैद्यकीय यंत्रणा मोठ्या दडपणाखाली काम करत आहे.
वैद्यकीय विभागात १४२ तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे विशेष चिंतेचा विषय ठरले आहेत. अनेक वेळा जाहिराती देऊनही तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने मनपाने त्यांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही, रिक्त पदे भरली जात नसल्याने आरोग्यसेवेची गुणवत्ता टिकवण्यास प्रशासनास अडचणी येत आहेत.
या पार्श्वभूमीवर मनपाने ७३ पदे मानधनावर भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बालरोगतज्जज्ञ, एक्स-रे तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), स्टाफ नर्स, ANM, एक्स-रे तंत्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांकडून २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
कोरोना काळात मंजूर झालेली ३४७ नवीन पदेही आस्थापना खर्च वाढण्याच्या कारणामुळे भरली जाऊ शकली नाहीत. शहरातील नागरिकांना सक्षम व वेळेवर आरोग्यसेवा मिळावी यासाठी ही भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता मनपाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Comments are closed.