सरकारचा महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्र सरकारने मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारविषयी प्रसारित होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बातम्यांचे निरीक्षण तसेच बनावट बातम्यांवर कारवाई करण्यासाठी हा सेल कार्यरत राहणार आहे.
१० कोटींचा निधी मंजूर
या सेलच्या स्थापनेसाठी आणि व्यवस्थापनासाठी सरकारने १० कोटी रुपये मंजूर केले आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या (DGIPR) प्रस्तावानुसार, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल आणि डिजिटल माध्यमांवर नजर ठेवण्यासाठी आणि अचूक विश्लेषण करण्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे.
विशेष डॅशबोर्ड आणि मोबाइल अॅप
ही एजन्सी मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करून डॅशबोर्ड आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून सरकारला माहिती पुरवणार आहे. एजन्सीची नियुक्ती एका वर्षासाठी केली जाईल आणि कार्यप्रदर्शन चांगले राहिल्यास करार दोन वर्षांसाठी वाढवला जाईल.
८ ते १० पर्यंत सेवा उपलब्ध
हा मीडिया मॉनिटरिंग सेल दररोज सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत कार्यरत राहील. याचे व्यवस्थापन माहिती आणि जनसंपर्क संचालनालय करणार आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडिया तसेच न्यूज वेबसाइट्स आणि न्यूज अॅप्सवरील बातम्यांचे निरीक्षण हा सेल करेल.
बातम्यांचे विश्लेषण आणि ट्रेंड ट्रॅकिंग
सरकारी बातम्या गोळा करून विश्लेषण करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिये द्वारे एका व्यावसायिक सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. कर्मचारी दिवसभर बातम्या, ट्रेंड आणि पत्रकारांच्या लिखाणाचा मागोवा ठेवणार आहेत, त्यामुळे सरकारला त्वरित कारवाई करता येणार आहे.