छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सत्र परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. एमसीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी हॉलतिकीटच न मिळाल्याने शेकडो विद्यार्थी पेपरपासून वंचित राहिले. श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च या महाविद्यालयाच्या कारभारामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. चौकशीअंती समोर आले की, संबंधित महाविद्यालयाला विद्यापीठाचे संलग्निकरणच नसल्यामुळे विद्यार्थ्यांची थेट फसवणूक झाली आहे.

विद्यापीठातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर परीक्षांचे वेळापत्रक घोषित झाले असून गुरुवारी एमसीए प्रथम सत्राची परीक्षा होती. विद्यार्थी सकाळीच हॉलतिकीटसाठी महाविद्यालयात पोहोचले; मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांनी हॉलतिकीट देण्यास सतत टाळाटाळ केली. योग्य माहिती न मिळाल्याने आणि परीक्षा फक्त काही तासांवर असताना हॉलतिकीट न दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला. अखेर विद्यार्थ्यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनीही या प्रकरणी विद्यापीठाशी संपर्क साधला.
शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, अशी माहिती मिळाली असून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर विद्यापीठातही पोहोचले. चौकशीदरम्यान विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले की महाविद्यालयाला अद्याप संलग्निकरण देण्यात आलेले नाही. समितीने मागील महिन्यात केलेल्या तपासणीत महाविद्यालयात मूलभूत सुविधा नसल्याचे आढळले होते. त्यामुळे संलग्निकरणाची प्रक्रिया प्रलंबित असून हा विषय न्यायालयीन आहे. अशा स्थितीत महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊन परीक्षा अर्ज भरून दिलेच कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. बी.एन. डोळे यांनी सांगितले की, एमसीए विद्यार्थ्यांचे प्रवेशच मंजूर नसल्याने त्यांची हॉलतिकीट जनरेट झाली नसतील. प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांनीही स्पष्ट केले की विद्यापीठाचा या प्रकरणी कोणताही दोष नाही. महाविद्यालय संलग्न नसताना परीक्षा अर्ज स्वीकारणे नियमबाह्य असून विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून पुढील कारवाईसाठी विद्यापीठ प्रशासन आता कायदेशीर पावले उचलत आहे.

Comments are closed.