मुंबईसह संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एकेकाळी पोलीस दलातील नोकरीकडे फारसा कल नसलेले तरुण आणि तरुणी, आता मोठ्या संख्येने या भरतीत सहभागी झाले आहेत.
यंदा राज्यभरातील १५,४०५ रिक्त पदांसाठी तब्बल १६.५२ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केल्याने स्पर्धा उच्चांकावर पोहोचली आहे. सरासरी पाहता, एका पदासाठी सुमारे १०८ उमेदवार मैदानात उतरले आहेत.
शिपाई, चालक, बँड्समन, कारागृह शिपाई, एसआरपीएफ अशा विविध पदांसाठी ही भरती सुरू असून, काही पदांसाठी स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. विशेषतः बँड्समनच्या केवळ १९ जागांसाठी जवळपास १७ हजार अर्ज आले असून, एका जागेसाठी सुमारे ८९५ उमेदवार स्पर्धेत आहेत. त्याचप्रमाणे कारागृह शिपाई आणि एसआरपीएफ पदांनाही मोठी मागणी आहे.
भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार रोखणे हे पोलिस प्रशासनापुढील मोठे आव्हान ठरत आहे. यापूर्वी लेखी परीक्षा व मैदानी चाचण्यांमध्ये हायटेक कॉपी, बनावट हॉल तिकीट, डमी उमेदवार अशा प्रकारांचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे उमेदवारांनी एजंट, क्लासचालक किंवा हमी देणाऱ्या मध्यस्थांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
भरतीचा पुढील टप्पा म्हणजे मैदानी चाचणी, जी २० जानेवारीपासून सुरू होणार असून, अर्जदारांमध्ये ग्रामीण भागातील उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.