राज्यात सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान अनेक परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहेत. परीक्षा केंद्रांवर बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे हे प्रकार पुराव्यासह समोर आल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठी कारवाई करत विविध जिल्ह्यांतील एकूण ८१ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय या प्रकरणात १० डमी विद्यार्थ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी मंडळाने ही कठोर भूमिका घेतली असल्याचे सांगण्यात आले.

मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील प्रकरणात १७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील कुर्ला तालुक्यातील यशवंत विद्यालय प्रकरणात एक, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर येथे २१ शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील तीन कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये झालेल्या गैरप्रकारांमध्ये मिळून पाच जणांवर कारवाई करण्यात आली.
जुमडा फाटा परिसरातील तीन शाळांतील एकूण २८ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील बोमनवार परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना चॅटजीपीटीच्या मदतीने कॉपी करण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्या प्रकरणात चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील बेटमोगरा येथे दोन, तर धाराशिव जिल्ह्यातील सलगरा येथे तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये केंद्र संचालक, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, परीक्षक, शिक्षक आणि शिपाई अशा विविध पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, परीक्षा सुरू होण्यापूर्वी राज्यभर कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले होते. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, भरारी पथके, पोलीस बंदोबस्त, बैठी पथके आणि आकस्मिक तपासण्या अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरीही काही ठिकाणी सामूहिक कॉपी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि विद्यार्थ्यांकडे मोबाइल सापडणे असे प्रकार समोर आले. त्यामुळे अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनासह फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे परीक्षा प्रक्रियेत शिस्त आणि पारदर्शकता राखण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

Comments are closed.