छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात शिक्षकांच्याच सहकार्याचा संशय व्यक्त होत आहे. कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून लिहित असल्याचे ‘सीसीटीव्ही’ फुटेजमधून स्पष्ट झाले. या गंभीर प्रकाराची दखल घेत शिक्षण विभागाने केंद्रसंचालकासह १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारपासून बारावीची लेखी परीक्षा सुरू झाली. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांतील ४५४ परीक्षा केंद्रांवरून सुमारे १ लाख ९० हजार ५९२ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरदरम्यान भरारी पथकाने संबंधित केंद्राला भेट दिली असता काही विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर केंद्रावरील ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासण्यात आले असता अनेक विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून लिहित असल्याचे आढळले. काही विद्यार्थी एकाच बाकावर बसलेले, तर काही उभे राहून उत्तरे लिहित असल्याचे दृश्य समोर आले.
या प्रकारात शिक्षकांचे सहकार्य असल्याचे दिसून आल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने ‘सीसीटीव्ही’ फुटेज ताब्यात घेतले. केंद्रसंचालकासह पर्यवेक्षक शिक्षक आणि बैठे पथकातील अधिकाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. संबंधितांवर शिस्तभंगाची तसेच कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील परीक्षा इतिहासातील ही सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे.
सदर केंद्रावर १४ परीक्षा दालने असून ३३४ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. इंग्रजीच्या पेपरसाठी ३२७ विद्यार्थी उपस्थित होते, तर सात जण गैरहजर होते. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन शिक्षण विभागाने तात्काळ संपूर्ण कर्मचारीवर्गाची अदलाबदल केली आहे. केंद्रप्रमुखांसह १७ कर्मचाऱ्यांची बदली करून नव्याने कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, पुढील सर्व परीक्षा शिस्तबद्ध व नियमानुसार पार पाडण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Comments are closed.