नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी आढळून आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात एकूण ४ लाख २२ हजार ७५८ लाभार्थी नोंदणीकृत असताना पात्रता पडताळणीनंतर तब्बल ३७ हजार ११५ लाभार्थ्यांचे डिसेंबरपासून हप्ते थकीत असल्याचे समोर आले आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या महिलांसाठी असलेल्या योजनेत जिल्हाभरात ७१० पुरुषांचे अर्ज आढळून आले असून अर्ज प्रक्रिया व पडताळणी यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तपासणीत ६५ वर्षांवरील ४ हजार ८३ लाभार्थी, घरातील सदस्य शासकीय नोकरीत असलेले ३० हजार २७१ लाभार्थी तसेच ई-केवायसीमध्ये वय २१ वर्षांखाली दाखविण्यात आलेले २ हजार ५१ लाभार्थी आढळून आले आहेत. या सर्व गटांचा मिळून ३७ हजार ११५ इतका आकडा असून सध्या या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ थांबविण्यात आला आहे.
प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार केवायसी प्रक्रियेदरम्यान तांत्रिक त्रुटी किंवा चुकीची माहिती भरली गेल्यामुळेही काही प्रकरणे निर्माण झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंतिम पडताळणीनंतरच खरी स्थिती स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, अपात्र लाभार्थ्यांमुळे खऱ्या गरजू महिलांना लाभ वेळेवर मिळावा यासाठी अर्ज व पडताळणी प्रक्रिया अधिक काटेकोर करण्याची गरज व्यक्त होत आहे. भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी प्रशासनाने तांत्रिक प्रणाली मजबूत करून लाभार्थ्यांची सखोल तपासणी करण्याची मागणीही पुढे येत आहे.

Comments are closed.