महाराष्ट्रात टीईटी परीक्षा वर्षातून दोनदा; जुलैमध्ये दुसरी परीक्षा होणार! | Maharashtra TET to Be Held Twice Yearly!

Maharashtra TET to Be Held Twice Yearly!

महाराष्ट्रातील शिक्षक पदासाठी अनिवार्य असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ज्या धर्तीवर वर्षातून दोनदा CTET परीक्षा घेतो, त्याच पद्धतीने आता राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टीईटी परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात दुसरी टीईटी परीक्षा आयोजित केली जाणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.

Maharashtra TET to Be Held Twice Yearly!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. तसेच, सेवेत असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा इतर पदोन्नती हवी असल्यास टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसह सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांसाठीही टीईटी उत्तीर्ण होणे अपरिहार्य ठरले आहे. अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठीच वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डॉ. बेडसे यांनी सांगितले की, आगामी टीईटी परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने पार पाडली जाईल. प्रश्नपत्रिका तयार करताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सखोल नियोजन केले जाईल. अलीकडील परीक्षेत एक प्रश्न रद्द करावा लागल्याची घटना घडली होती; भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.

गुणांमध्ये कोणतीही शिथिलता नाही
टीईटी परीक्षेत पात्र होण्यासाठी

  • खुल्या प्रवर्गासाठी: 60% म्हणजे 90 गुण
  • आरक्षित प्रवर्गासाठी: 55% म्हणजे 83 गुण आवश्यक आहेत.
    सेवेत असलेल्या शिक्षकांना किमान गुणांमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी काही शिक्षक संघटना, मंत्री आणि आमदारांकडून करण्यात आली आहे. मात्र, गुणांमध्ये कोणतीही शिथिलता देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

कोल्हापूर प्रकरणातील निकाल राखीव
टीईटी परीक्षेदरम्यान कोल्हापूर येथे पेपर फुटल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यासंदर्भात चौकशी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात पेपर फुटल्याचे आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा अत्यंत गोपनीय आणि सुरक्षित पद्धतीने घेतली जाते, असेही परिषदेकडून सांगण्यात आले. मात्र, संबंधित उमेदवारांचा निकाल सध्या राखीव ठेवण्यात आला असून सुनावणीनंतर तो जाहीर केला जाणार आहे.

राज्यातील शिक्षक पदाच्या इच्छुकांसाठी वर्षातून दोनदा टीईटी परीक्षा होणार असल्याने तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments are closed.