महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी यंदाची भरती अत्यंत चुरशीची ठरली आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात जाहीर झालेल्या १५,४०५ रिक्त पदांसाठी तब्बल १६ लाख ५२ हजार ८५० उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, ही संख्या आतापर्यंतच्या सर्वाधिक अर्जांपैकी एक मानली जात आहे. त्यामुळे एका जागेसाठी सरासरी १०८ उमेदवार रिंगणात उतरल्याचे स्पष्ट चित्र आहे.

राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद
शासनाने पोलीस भरतीची घोषणा केल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. शिपाई, चालक, बँड्समन, कारागृह शिपाई आणि एसआरपीएफ अशा विविध पदांसाठी ही भरती होत आहे. सुरुवातीला ३० नोव्हेंबर रोजी अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख ठेवण्यात आली होती; मात्र उमेदवारांचा मोठा प्रतिसाद आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मागण्यांमुळे ही मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली.
ग्रामीण भागातील तरुणांची लक्षणीय उपस्थिती
अर्ज प्रक्रियेच्या आकडेवारीकडे पाहता, यंदा ग्रामीण भागातील उच्चशिक्षित तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नोकरीतील स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि करिअरची सुरक्षितता या कारणांमुळे पोलीस भरतीकडे तरुणांचा कल वाढत चालल्याचे दिसून येते.
मैदानी चाचणीचा थरार २० जानेवारीपासून
भरती प्रक्रियेचा पुढील आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे मैदानी चाचणी, जी २० जानेवारीपासून सुरू होणार आहे. या चाचणीत उमेदवारांची शारीरिक क्षमता, सहनशक्ती आणि फिटनेस तपासला जाणार असून, हजारो उमेदवारांसाठी हा टप्पा निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे सध्या उमेदवारांकडून कसून सराव आणि तयारी सुरू आहे.
काही पदांसाठी प्रचंड चुरस
पदनिहाय स्पर्धा पाहता काही पदांसाठी चुरस कमालीची वाढली आहे. विशेषतः बँड्समनच्या केवळ १९ जागांसाठी सरासरी ८९५ उमेदवार अर्जदार आहेत. तसेच शिपाई पदासाठी १२,७०२ जागांसाठी ७,८६,५०० अर्ज, चालक पदासाठी ४७८ जागांसाठी १,८०,००० अर्ज, कारागृह शिपाईसाठी ५५४ जागांसाठी ३,३४,३५० अर्ज आणि एसआरपीएफसाठी १,६५२ जागांसाठी ३,३५,००० अर्ज प्राप्त झाले आहेत.
गैरप्रकार रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान
यापूर्वीच्या भरती प्रक्रियांमध्ये लेखी परीक्षेदरम्यान इअर बर्ड, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बनावट हॉल तिकीट वापरण्याचे प्रकार तसेच मैदानी चाचणीत पायातील चिपची अदलाबदल करून पात्र ठरण्याचे गैरप्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे यंदाच्या भरतीत लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी दोन्ही टप्प्यांत पारदर्शकता राखणे आणि गैरप्रकार रोखणे हे पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
मेहनत आणि तयारीच यशाची गुरुकिल्ली
एकूणच, महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ ही आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि कठीण स्पर्धांपैकी एक ठरणार आहे. या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी केवळ इच्छाशक्ती नव्हे, तर सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध तयारी आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मेहनत करणाऱ्यांसाठीच ही लढाई विजयाची ठरेल, यात शंका नाही.

Comments are closed.