राज्यात पोलिसांच्या 17,471 पदांच्या मेगा भरतीस मंजुरी – Maharashtra Police Bharti 2024

0

राज्यातील तरुणांसाठी नवीन वर्षात चांगली बातमी आली आहे. राज्याच्या पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या युवकांना चांगली संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 17,471 पोलिसांची भरती केली जाणार आहे. 2024 मध्ये ही मेगा भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यात 70 वर्षांपूर्वीच्या आकृतीबंधानुसारच सध्या पोलीस दलातील मनुष्यबळ आहे. परंतु आता नवीन आकृतीबंध तयार केला गेला आहे. या आकृतीबंधानुसार भरती करण्यास वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात तब्बल 17,471 पोलिसांची भरती केली जाणार आहे. पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई चालक यापदांसाठी लवकरच जाहिरात निघणार आहे.

 

कंत्राटी भरतीवरुन अधिवेशनात वादळ
पोलीस दलात कंत्राटी भरती होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी हिवाळी अधिवेशात सरकारवर जोरदार टीका केली होती. शिंदे-फडणवीस सरकार पोलीस दलात कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा हा आरोप फेटाळून लावला. तसेच नवीन आकृतीबंधानुसारच राज्यात पोलीस भरती होणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यांमधील गावांची गरज ओळखून नवीन पोलीस ठाणेही मंजूर केले गेली असल्याचे त्यांनी म्हटले होते.

पोलीस दलात 100 टक्के भरती
राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते. परंतु हा नियम पोलीस दलासाठी अपवाद ठरला आहे. राज्याच्या पोलीस दलात 100 टक्के पदभरतीला मान्यता दिली आहे. यामुळे आता 17,471 पदांसाठी भरतीची जाहिरात निघणार आहे. मागील वर्षी राज्यात 23 हजार पोलिसांची भरती करण्यात आली होती. त्या भरतीचे प्रशिक्षण राज्यातील दहा केंद्रांमध्ये सुरु आहे. हे प्रशिक्षण या महिन्यात संपणार आहे. यामुळे आता नवीन भरतीची प्रक्रिया सुरु होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.