राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने शेकडो रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ एप्रिल २०२५ आहे.
महापारेषण कंपनीच्या अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे आणि वाशी या सात परिमंडल कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी भरती केली जात आहे. तसेच, ऐरोली येथील राज्य भार प्रेषण केंद्रासाठीही अर्ज मागवण्यात आले आहेत. वेतनगट ३ मधील निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पात्रता व अटी:
- वाणिज्य शाखेतील पदवीधर व एमएस-सीआयटी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.
- या पदांसाठी कोणताही अनुभव आवश्यक नाही.
- अर्जदारांचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे.
- मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट.
- माजी सैनिकांसाठी त्यांची सैनिकी सेवा अधिक ३ वर्षे इतकी वयोमर्यादा.
- दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे.
परीक्षा पद्धत:
- भरतीसाठी १५० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.
- परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर होणार आहे.
- खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ₹६००, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹३०० आहे.
अधिक माहितीसाठी महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि वेळेत अर्ज सादर करा!