महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मंजूर होऊनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप ‘पूर्वसंमती’ मिळालेली नाही. यामागे मुख्य कारण म्हणजे आवश्यक कागदपत्रे वेळेत अपलोड न होणे आणि तालुका स्तरावर होणाऱ्या तपासणीस (स्क्रूटिनी) लागणारा विलंब.
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, आरकेव्हीवाय व कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान अंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले. मात्र हजारो अर्ज ‘कागदपत्रे अपलोड प्रलंबित’ या स्थितीत अडकले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव न झाल्याने ती पोर्टलवर सादर केली नाहीत. त्यामुळे पुढील प्रक्रिया थांबली आहे.
इतकेच नव्हे, तर कागदपत्रे अपलोड झाल्यानंतरही निधीअभावी पूर्वसंमती देण्यास विलंब होत आहे. यामुळे अनुदानाची प्रक्रिया रखडली असून शेतकरी संभ्रमात आहेत.
कृषी विभागाचे आवाहन:
ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनी तातडीने सर्व आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावीत. विहित मुदतीत कागदपत्रे न सादर केल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.